औरंगाबाद : येत्या एक ऑगस्टपासून सुरू होणारी भाजपची महा जनादेश यात्रा १९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित तीन मतदार संघातून ही यात्रा जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीत २२० जागांचे उद्दिष्ट ठेवून भाजपने महा जनादेश यात्रेची तयारी चालवली आहे. एक ऑगस्ट रोजी विदर्भातून राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना अभिवादन करून यात्रेचा प्रारंभ होईल. विदर्भानंतर दुसऱ्या टप्प्यात १८ ऑगस्ट रोजी मराठवाड्यात या यात्रेचा प्रवेश होईल. बीड जिल्ह्यात १८ तर १९ ऑगस्टला अंबड हून चिकलठाणा येथे आल्यानंतर यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. तर २० ऑगस्ट रोजी सकाळी औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यातून ही यात्रा भोकरदनला जाईल. जालना येथे यात्रेचा मुक्काम होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे, मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अतुल सावे, मराठवाडा महामंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, आदी नेते या यात्रेत सहभागी होणार आहेत.
मराठवाडा यात्रा प्रमुखपदी बोराळकर
महा जनादेश यात्रेची मराठवाड्यातील जबाबदारी भाजपाचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्यावर टाकण्यात आली आहे. परवा मुंबईत पार पडलेल्या भाजप कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख नेते तसेच पदाधिकारी यांना या यात्रेत सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात्रेचा मार्ग तसेच स्वागताचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.